उपनिबंधक कार्यालये, सुट्टीच्या दिवशीही सुरू राहतील. - In India Live

Breaking News

03/05/2023

उपनिबंधक कार्यालये, सुट्टीच्या दिवशीही सुरू राहतील.

प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव्ह 
मुंबई, दि. ३ मे : सामान्य जनतेच्या सोयीसाठी जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत, त्यामुळे नागरिकांना दस्त नोंदणीत अडचण निर्माण होणार नाही आणि यापुढे नॉनस्टॉप दस्त नोंदणी होणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 
खरेदी -विक्री व्यवहारामध्ये वाढ होत असल्याने नागरिकांना त्यांच्या कामाच्या वेळेत दस्त नोंदणी करणे शक्य होत नाही, तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची वाढती गर्दी वाढत लक्षात घेता नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणी करता यावी या दृष्टिकोनातून हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई विभागातील (मुंबई शहर, उपनगर), कोकण विभागातील (ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड अलिबाग), पुणे विभागातील ( सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर), अमरावती विभागातील (अकोला, अमरावती),  नागपूर विभागातील (नागपूर), लातूर विभागातील( लातूर, नांदेड), नाशिक विभागातील( नाशिक, जळगाव), औरंगाबाद विभागातील (औरंगाबाद) जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. नागरिकांनी  या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. 
महसूल विभाग अधिक जनताभिमुख करण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी  विविध धोरणात्मक निर्णय घेतले आहे. सलोखा योजना, अवघ्या ६०० रुपयात वाळू उपलब्ध करून देणारे नवीन वाळू धोरण, जमीन मोजणी अशा निर्णयामुळे जनतेला महसूल विभागाच्या सेवा अधिक सुलभतेने मिळू लागल्या आहेत. 

No comments:

Post a Comment