लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एसटीची महत्त्वाची भूमिका; विविध सवलत योजनांचा लाभ - In India Live

Breaking News

05/07/2026

लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एसटीची महत्त्वाची भूमिका; विविध सवलत योजनांचा लाभ


प्रफुल चव्हाण | इन इंडिया लाईव्ह

मुंबई, दि. ५ जुलै : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) राज्यातील लाखो शालेय
विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत असून, विविध सवलत योजनांद्वारे त्यांच्या शिक्षणाला हातभार लावत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्यात दररोज सुमारे ३०,१७७ शालेय फेऱ्यांद्वारे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्याची सुविधा दिली जाते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शालेय वेळेत बसस्थानकांवर पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. तसेच, प्रवासादरम्यान अडचण निर्माण झाल्यास मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळाने स्वतंत्र टोल-फ्री मदत केंद्र सुरू केले आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडथळा येऊ नये, यासाठी एसटी महामंडळ विविध सवलत योजना राबवत आहे. अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना १०० टक्के मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. याशिवाय विद्यार्थी मासिक पासवर ६६.६७ टक्के सवलत, शैक्षणिक सहलींसाठी ५० टक्के सवलत तसेच परीक्षा, शिबिरे आणि अन्य शैक्षणिक कारणांसाठीही प्रवासभाड्यात सवलत दिली जाते.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत २५.१३ लाख अहिल्याबाई होळकर पास आणि २७.९८ लाख विद्यार्थी मासिक पास वितरित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रियाही सुरू असून त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

मानव विकास योजनेअंतर्गत राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये ९६६ बसेसद्वारे ७३ हजार ६२१ मुलींना मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली.

No comments:

Post a Comment