प्रफुल चव्हाण | इन इंडिया लाईव
मुंबई, २९ ऑगस्ट २०२६ नेपाळ–तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या मोठ्या पूरामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, महाराष्ट्रातील ४०४ नागरिक तेथे अडकले असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
२९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत अडकलेल्या ४०४ नागरिकांपैकी ३३८ नागरिकांशी संपर्क प्रस्थापित झाला असून ते सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय, ६० नागरिक रिचा टूर्स प्रा. लि. या संस्थेमार्फत गेले होते. या गटाशी अद्याप थेट संपर्क होऊ शकलेला नाही. आणखी ६ नागरिकांची माहिती लिंकद्वारे प्राप्त झाली असून त्यांच्याशीही संपर्क साधता आलेला नाही.
दरम्यान, सुरक्षित असलेल्या ४०४ नागरिकांपैकी नागपूरमधील १०५ नागरिक भारतात परतले आहेत. तसेच ३७ नागरिक सागा (मानसरोवरजवळ) येथून भारताच्या दिशेने रवाना झाले आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाकडून चीन/तिबेट परिसरात असलेल्या भारतातील १४९ नागरिकांची यादी महाराष्ट्राला प्राप्त झाली आहे. हे नागरिक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील असल्याने संबंधित जिल्ह्यांमार्फत त्यांची माहिती पडताळण्याचे काम वेगाने सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून (SEOC) अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी वेब-आधारित लिंक तयार करण्यात आली असून ती सर्व जिल्ह्यांना तसेच माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाशी सातत्याने समन्वय साधला जात असून, आवश्यक बचाव पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.
नागरिकांच्या मदतीसाठी मदत कक्ष सुरू करण्यात आला असून, जिल्ह्यांमार्फत अडकलेल्या नागरिकांच्या माहितीची पडताळणी सुरू आहे. प्रवासी संस्था व कुटुंबीयांशी हेल्पलाइनद्वारे सातत्याने संपर्क ठेवला जात आहे. अद्ययावत माहिती गृह मंत्रालयाच्या आपत्कालीन प्रतिसाद नियंत्रण कक्षासह (ICR-ER), परराष्ट्र मंत्रालय नियंत्रण कक्ष आणि महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांना पाठविण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment