निवडणूक कामासाठी कर्मचारी मग्न, भूमापन सेवा वाऱ्यावर ? - In India Live

Breaking News

06/08/2026

निवडणूक कामासाठी कर्मचारी मग्न, भूमापन सेवा वाऱ्यावर ?

 
प्रफुल चव्हाण / इन इंडिया लाईव 
उल्हासनगर : उल्हासनगर नगर भूमापन कार्यालयात आधीच कर्मचाऱ्यांचा तुटवडा असताना काही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) मोहिमेची जबाबदारी सोपविण्यात आल्याने कार्यालयातील उपलब्ध मनुष्यबळ आणखी कमी झाले आहे. त्यामुळे सध्या कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अतिरिक्त कामाचा भार पडत असून, कार्यालयीन कामकाजावर त्याचा परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.

त्यातच विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामांची जबाबदारी आल्याने नियमित भूमापनविषयक कामांच्या निपटाऱ्यावर परिणाम होत असून, सर्वसामान्य नागरिकांना काही प्रमाणात विलंबाचा सामना करावा लागत आहे.
नगर भूमापन कार्यालयात दररोज मोठ्या संख्येने नागरिक विविध भूमापनविषयक कामांसाठी येत असतात. मात्र, उपलब्ध मनुष्यबळ अपुरे असल्याने अनेक प्रकरणांच्या निपटाऱ्यास विलंब होत असून, नागरिकांना कार्यालयात प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामांवर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी पुनर्नियुक्त करून नगर भूमापन कार्यालयातील मनुष्यबळ पूर्ववत करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. यामुळे कार्यालयीन कामकाजाला गती मिळेल, प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा होईल आणि नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment