शूर पोलिसांसाठी सरकारचा मोठा निर्णय; ५० हजारांचा रोख पुरस्कार मिळणार - In India Live

Breaking News

06/10/2026

शूर पोलिसांसाठी सरकारचा मोठा निर्णय; ५० हजारांचा रोख पुरस्कार मिळणार

प्रफुल चव्हाण | इन इंडिया लाईव्ह

मुंबई | दि : ६ ऑक्टोबर २०२६ महाराष्ट्रातील पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना दाखवलेले अतुलनीय शौर्य, धाडस आणि कर्तव्यनिष्ठा यांचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. या पदकासाठी निवड झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.


महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा


पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दहशतवाद, नक्षलवाद, जातीय दंगली, संघटित गुन्हेगारी, तस्करी तसेच अंतर्गत व बाह्य सुरक्षेशी संबंधित आव्हानांचा सामना करताना स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावतात. अशा धाडसी कामगिरीची दखल घेऊन पोलिसांचे मनोबल वाढवणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

दरवर्षी १ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला या पदकाची घोषणा करण्यात येणार आहे. पदकांची संख्या निश्चित ठेवण्यात आलेली नसून, प्रत्यक्ष कामगिरी आणि प्राप्त प्रस्तावांच्या गुणवत्तेनुसार पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड केली जाणार आहे. संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला असल्यास मरणोत्तर पदक देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.


तीन स्तरांवर होणार निवड प्रक्रिया


पदकासाठी पात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी समित्यांची रचना निश्चित करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखालील समिती प्राथमिक स्तरावर प्रस्तावांची छाननी करणार आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव संबंधित परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांमार्फत पुढे पाठवले जातील. पोलीस आयुक्तालयातील प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे सादर केले जातील. त्यानंतर गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शासनस्तरीय समिती प्रस्तावांची तपासणी करेल. अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात येतील. निवड प्रक्रिया, समित्यांची रचना आणि योजनेच्या अंमलबजावणीसाठी होणाऱ्या आनुषंगिक खर्चालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.


शूर पोलिसांच्या कामगिरीला मिळणार मान्यता


केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य पदके दिली जातात. त्याच धर्तीवर पश्चिम बंगाल, तमिळनाडू, तेलंगणा, मेघालय, मणिपूर आणि केरळ यांसारख्या राज्यांमध्येही पोलिसांसाठी स्वतंत्र सन्मान योजना राबविल्या जातात.

महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ योजनेमुळे जोखमीच्या परिस्थितीत धाडसाने कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीला राज्यस्तरावर मान्यता मिळणार आहे. तसेच पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणे, धैर्याने आणि समर्पित भावनेने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment