युतीसाठी शिवसेनेसमोर मुळीच झुकणार नाही-अमित शहा - In India Live

Breaking News

03/01/2019

युतीसाठी शिवसेनेसमोर मुळीच झुकणार नाही-अमित शहा

प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव
मुंबई:दी.3 भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेना युतीसंदर्भातील अत्यंत महत्वपूर्ण भाष्य केले आहे. राज्यातील भाजप खासदारांच्या बैठकीत त्यांनी शिवसेनेशी युती करायची तर आपले काहीही गमवायचे नाही. काही गमावून का युती करायची, असा सवाल शहा यांनी केल्याचे समोर आले आहे. तसेच शिवसेनेकडून उत्तरासाठी शेवटपर्यंत वाट पाहू या, मात्र स्वबळावर लढण्याचीही तयारी ठेवा, असा आदेशच शहा यांनी खासदारांना दिला. शिवसेनेसमोर झुकणार नाही, असे ते म्हणाले.

अमित शहा यांनी राज्यातील भाजप खासदारांची बैठक बोलवली होती. त्यात शिवसेनेशी युती करण्याचा विषयच चर्चेच्या केंद्रस्थानी होता, असे समजते.महाराष्ट्रात युती करायचीच असेल तर काही गमावून होणार नाही. बिहारसारखी भूमिका भाजप महाराष्ट्रात घेणार नाही, असे शहा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.बिहारमध्ये जेडीयूला दया दाखवली तशी दया शिवसेनेला दाखवली जाणार नाही, असे उद्गार शहा यांनी काढले. त्यामुळे शिवसेनेला  बिहारप्रमाणे जास्तीच्या जागा पदरात पाडून घेता येणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने भाजप युतीसाठी आग्रह धरत आहे याचा वेगळाच अर्थ काढत एकदम अर्ध्या जागा मागितल्या होत्या. किंवा कमी जागा लढवल्या तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, अशी अट घातली होती. भाजप अशा अटी मान्य करणे शक्य नाही, हे शहा यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ भाजप शिवसेनेबाबत जेडीयूसारखी मानहानीकारक तडजोड करणार नाही. तसेच शिवसेनेबाबत नरमाईची भूमिकाही घेणार नाही, असा होतो.शहा यांनी शिवसेनेच्या उत्तराची शेवटपर्यंत वाट पहाणार असल्याचेही सांगितले. परंतु स्वबळावर लढण्यासाठी खासदारांना जास्तीत जास्त वेळ मतदारसंघात देण्याचेही फर्मान काढले आहे.

भाजपने युतीसाठी वारंवार शिवसेनेकडे आग्रह धरला आहे. मुख्यमंत्रीही आतापर्यंत शिवसेनेशी युती करण्याबाबत सकारात्मक होते. अमित शहा मुंबईत आले तेव्हा शिवसेनेशी जाहीर वाद टाळा, असा सल्लावजा आदेश देऊन गेले होते. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंढरपूरच्या सभेत चोर म्हटल्याने भाजप बिथरला आहे. मुख्यमंत्र्यांनीही नरमाईचा पवित्रा सोडून शिवसेनेला धडा शिकवण्याची भाषा केली होती. त्यामुळे भाजप आता शिवसेनेशी जुळवून घेण्याच्या मन:स्थितीत नाही, हे शहा यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. युतीची शक्यता मावळल्यात जमा आहे.भाजप खासदारांच्या या बैठकीला माजी मुख्यमंत्री नारायण राणे हेही उपस्थित होते.

No comments:

Post a Comment