प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव्ह
मुंबई.दि ३० किमान वेतन कायदा लागू करावा या प्रमुख मागणीसाठी गेले दोन दिवस संपावर असलेल्या आरोग्य सेविकांनी आज थेट मंत्रालयात धडक दिली.मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आरोग्य सेविकांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत ठिय्या आंदोलन केले.पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या आरोग्य सेविकांना ताब्यात घेऊन त्यांना मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी नेले.
शेकडो महिला या आंदोलनात सहभागी झाल्या . महिलांच्या ठिय्या आंदोलनाने पोलिसांची ही ऐनवेळी तारांबळ उडाली . त्यानंतर आरोग्य सेविकांच्या प्रतिनिधीना पोलिसांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात आणण्यात आले .
किमान वेतन कायदा , प्रसूती कायद्यानुसार रजा ,भविष्य निर्वाह निधी ,किमान घरभाडे भत्ता या मागण्यांसाठी गेले दोन दिवस मुंबई महापालिकेतल्या चार हजार आरोग्य सेविकांनी बेमुदत संप पुकारला आहे . गेली वीस वर्ष आरोग्य सेविकांच्या मागण्यांसाठी लढा सुरूच असल्याचे मंजू कांबळे या आंदोलकर्त्या सेविकेने सांगितले . २ मार्च २००२ साली औद्योगिक न्यायाधिकरणाने आरोग्य सेविका या मुंबई महापालिका कर्मचारी असल्याचा निवड केला होता असेही कांबळे यांनी सांगितले . न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकार दरबारी न्याय मिळत नसल्याने आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले असल्याचे आरोग्य सेविकांनी सांगितले .
No comments:
Post a Comment