बालमृत्यू रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन करावा-आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे - In India Live

Breaking News

26/01/2019

बालमृत्यू रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन करावा-आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाइव
मुंबई, दि. 25 : मेळघाटमधील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी महिला व बालविकास, आदिवासी विकास,अन्न व नागरी पुरवठा  यासह अन्य विविध विभागांशी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजनांचा मेळघाट ॲक्शन प्लॅन तातडीने तयार करावा, असे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

मेळघाटमधील बालमृत्यूचा आढावा घेण्यासंदर्भात मंत्रालयात आरोग्यमंत्र्यांनी बैठक घेतली. अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा या तालुक्यात कुपोषणामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून या भागातला बालमृत्यू दर शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

शासनाच्या उपाययोजनांसोबतच टाटा ट्रस्टसारख्या अन्य सामाजिक संस्थांची मदत याकामी घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. विविध कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) मेळघाटमध्ये आरोग्य सुविधांचे बळकटीकरण त्याचबरोबर या भागात सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, नर्स यांच्याकरिता उत्तम अशा पायाभूत सुविधांची उभारणी, आदिवासी बांधवांना रोजगार, वीज पुरवठा, मोबाईल संपर्क यंत्रणा उभारणे या सर्व बाबींचा समावेश असलेला एकत्रित असा मेळघाट ॲक्शन प्लॅन त्वरित तयार करावा. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा ॲक्शन प्लॅन यशस्वीपणे अंमलात आणण्याकरिता प्रयत्न करण्यात येतील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

दुर्गम भागात आशा वर्कर्सच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा दिल्या जातात. त्यांना दुर्गम भागात संपर्क यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून वन विभागाच्या मदतीने बिनतारी संदेश यंत्रणा पुरविण्याबाबत वन विभागाशी चर्चा करण्यात येईल, जेणेकरून आशा वर्कर्सना रूग्णवाहिकांशी संपर्क करणे शक्य होईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त अनूपकुमार यादव, हिंदुजा रुग्णालयाचे संचालक डॉ.अविनाश सुपे, सहआयुक्त डॉ. सतीश पवार, सहसंचालक डॉ.अर्चना पाटील यांच्यासह विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment