मुंबई : मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट,झव्हेरी बाजार येथील लहान-मोठ्या रस्त्यांवर दिसणाऱ्या हातगाड्या येत्या काळात बाद होण्याची शक्यता आहे.वाहतूक कोंडीस कारभीभूत ठरणाऱ्या हातगाड्याऐवजी चालकांना बॅटरीवर चालणाऱ्या ढकलगाडी देता येतील का याची चाचपणी सुरू असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.यासाठी आयआयटीसारख्या संस्थेचीही मदत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.मुंबादेवी मंदिर,काळबादेवी,क्रॉफर्ड मार्केट,झवेरी बाजार आदी परिसरात दिवसभर मोठ्या प्रमाणात हातगाड्यांवरून सामानाची ने – आण सुरू असते.मुंबईतील अनेक वर्षांची ही परंपरा आहे.या हातगाड्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीही होते.
अवजड सामान लादलेल्या हातगाड्या ओढताना कामगारांना होणारे श्रम आणि हातगाड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी हातगाडीचालकांना बॅटरीवर चालणाऱ्या ढकलगाडी देता येतील का याचाही विचार सुरू असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.माणूसकीच्या दृष्टीने हातगाडी कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी आपण याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा केली असून बॅटरीवर चालणाऱ्या ढकलगाड्या दिल्यास त्या वेगाने पुढे जातील आणि वाहतूक कोंडी होणार नाही,असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment