डोंबिवली,गोपीनाथ चौक १४ नोव्हेंबर: डोंबिवलीच्या विकासासाठी नव्या दिशेने पाऊल उचलत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भव्य परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सभेत दिपेश म्हात्रे यांनी जनतेला प्रश्न विचारला की, "आपल्या मतदारसंघात कोणताही पुनर्विकास झाल्याचा अनुभव आपल्याला मिळाला आहे का?" यावर उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे "नाही" असा प्रतिसाद देत त्यांच्या प्रश्नाला पाठिंबा दिला. म्हात्रे यांनी नमूद केले की, "डोंबिवलीची लोकसंख्या १७ लाखांच्या पुढे गेली आहे, पण या सांस्कृतिक नगरीला अद्याप योग्य प्रसिद्धी आणि प्रगती मिळालेली नाही. केवळ सुशोभीकरणावर भर न देता मुलभूत गरजांकडे लक्ष देणे गरजेचे आहे." त्यांनी सांगितले की, "डोंबिवलीत स्टार्टअप संस्कृती निर्माण करून 1 lakh तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे. ‘डोंबिवलीत परिवर्तन’ हाच एकमेव मार्ग आहे, ज्याद्वारे आपण प्रगतीचे नवे पर्व सुरू करू शकतो."
म्हात्रे यांनी जनतेला संबोधित करत, पाणी पुरवठ्याची समस्या इतर भागांपेक्षा जास्त तीव्र असल्याचे नमूद केले आणि ते पुढे म्हणाले, "डोंबिवलीच्या नागरिकांना पाणी पुरवठा अधिक कार्यक्षम आणि सुरळीत होण्यासाठी, नगरपालिकेला तातडीने कार्यवाही करायला हवी."
गोपीनाथ चौक भागातील पाणी समस्येचा गंभीर प्रश्न अजूनही सोडवला गेलेला नाही. या भागातील नागरिकांनी पाणी मिळवण्यासाठी संघर्ष केला आहे आणि हा प्रश्न किती महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेऊन या समस्येवर त्वरित उपाय योजले जाणे आवश्यक आहे."
खासदार अरविंद सावंत यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीवर भाष्य करत "डोंबिवलीत सूर्य काही उगवलाच नाही," असे नमूद केले. त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेचा आणि तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा उपस्थित करत विचारले, "महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवलंय? या काळात महाराष्ट्र कलंकित झाला आहे." सावंत यांनी देशाच्या पंतप्रधानांवर टीका करत मणिपूरमधील महिलांवरील अन्यायाच्या मुद्द्यावर त्यांच्या शांततेबद्दल प्रश्न विचारला, "मणिपूरमध्ये झालेल्या अन्यायावर पंतप्रधानांनी एक शब्दही बोलले नाहीत."
खासदार सावंत यांनी म्हात्रे यांच्या युवा नेतृत्वाचे कौतुक करत सांगितले, "मला शंभर टक्के विश्वास आहे की, दिपेश म्हात्रे हे या विधानसभेत विजयी होतील आणि डोंबिवलीच्या जनतेसाठी योग्य नेतृत्व साकारतील."
या परिवर्तन सभेत म्हात्रे यांनी जनतेला आश्वासन दिले की, "जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील, तेव्हा ५०० चौरस फूट घरांचे कर माफ केले जातील," ज्यामुळे डोंबिवलीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या सभेत डोंबिवलीकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत म्हात्रे यांच्या नेतृत्वाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
No comments:
Post a Comment