घर-घर तिथे संविधान आणि शिवशक्ती–भीमशक्ती ऐक्याचा संदेश – डॉ. नीलम गोऱ्हे - In India Live

Breaking News

29/11/2025

घर-घर तिथे संविधान आणि शिवशक्ती–भीमशक्ती ऐक्याचा संदेश – डॉ. नीलम गोऱ्हे

प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव,

पुणे, दि. २८ नोव्हेंबर २०२५ : शिवसेना भवन, सारसबाग येथे झालेल्या ‘शाखा तिथे संविधान’ अभियानात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन केले. भारतीय संविधानातील सामाजिक न्याय, आरक्षणाचे मूलभूत उद्दिष्ट आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आजची गरज यावर त्यांनी थोडक्यात पण स्पष्ट भाष्य केले.


डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “संविधान हे एका समाजाचे नसून सर्व नागरिकांचे आहे. सामाजिक समता प्रस्थापित होईपर्यंत शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण आवश्यक आहे.” सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा अधोरेखित केलेली ५०% आरक्षण मर्यादा, बाबासाहेबांनी मांडलेले तत्त्व आणि इतिहासातील संघर्ष त्यांनी उपस्थितांसमोर मांडले.


शिवसेनेची शिवशक्ती–भीमशक्ती परंपरा, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ आणि दलित–बहुजन समाजाच्या राजकीय सहभागाबाबत शिवसेनेची भूमिका यावरही त्यांनी उल्लेख केला. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त फुले–आंबेडकर विचारांची आजची उपयुक्तता त्यांनी सांगितली.


महिला सुरक्षिततेबद्दल बोलताना अलीकडील गंभीर घटनांचा संदर्भ देत प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. “केवळ राजकारणापुरते न थांबता समाजासाठी काम करा,” असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.


कार्यक्रमात प्रत्येक शाखेत संविधान प्रस्तावना लावणे, ६ डिसेंबरला विशेष स्टेटस ठेवणे, संविधान आणि राज्यशास्त्रावरील साप्ताहिक व्याख्यानमाला सुरू करण्याची सूचना देण्यात आली.


अभियानाचे प्रमुख संयोजक व प्रवक्ते किरण सोनावणे म्हणाले, “शिवसेनेच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसेना शाखेत संविधानाची प्रस्ताविका व प्रत ठेवून संविधानिक मूल्यांचा व्यापक प्रसार केला जाईल. एक शायर म्हणतो, ‘दोस्त, कभी फुरसत मिले तो मुझे पढ़ना, मुझमें तेरे हर उलझनों का समाधान है… मैं कोई और नहीं, तेरे देश का संविधान हूँ’


शिवसेना भवनात झालेल्या या कार्यक्रमात मिलिंद अहिरे, अनुसूचित जाती शिवसेना पुणे शहर प्रमुख, शिवसेना प्रवक्ते आणि पत्रकार किरण सोनवणे यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच, पुणे शहर सह संपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, शहर प्रमुख पूजा रावेतकर, महानगर प्रमुख कल्पना थोरवे, संदीप शिंदे शहर सचिव, नितीन पवार कोथरूड विधानसभा प्रमुख सुनील जाधव, गौरव साईनकर, सुधीर जोशीं, संदिप शिंदे , एकनाथ ढोले, आणि अन्य प्रमुखांचाही या प्रसंगी विशेष सहभाग होता. सर्व पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.

No comments:

Post a Comment