मंत्रालयाचे उपहारगृह खाद्यसंस्कृतीचे आहार केंद्र - In India Live

Breaking News

12/01/2026

मंत्रालयाचे उपहारगृह खाद्यसंस्कृतीचे आहार केंद्र

प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव्ह
मुंबई दि.१२.जानेवारी मंत्रालयाचे उपहारगृह हे सध्या केवळ पोट भरण्याचे ठिकाण न राहता, खाद्यसंस्कृतीचे एक समृद्ध केंद्र बनले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत उकळणाऱ्या कढईतून दरवळणारा खमंग सुगंध आणि ‘अतिथी देवो भव’ या मूल्यांचा आपुलकीने केलेला स्वीकार—येथील स्वादिष्ट पदार्थांतून मन भारावून जाते.

मंत्रालय म्हटले की डोळ्यांसमोर उभे राहते ती प्रचंड धावपळ,टेबलावर रचलेल्या फायली, वरिष्ठांचा कामाचा तगादा आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटलेली घाई.अशा तणावग्रस्त वातावरणातून जेव्हा एखादा अधिकारी, कर्मचारी किंवा अभ्यागत मंत्रालय उपहारगृहाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवतो, तेव्हा काही क्षणांतच चेहऱ्यावरील ताण विरघळून जातो.

या उपहारगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे पदाची श्रीमंती आणि कामाचा व्याप काही काळ विसावतो. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर सही करणारी लेखणी इथे गरम चहा प्रमाणे तेज चालती तसेच गंभीर चर्चांपासून दूर अधिकारी वाफाळत्या चहाच्या घोटासोबत सहकाऱ्यांशी हास्यविनोद करताना दिसतात. फायलींच्या ओझ्याखाली थकलेली मनं येथे काही काळ विसावतात हीच त्यांच्या कामाची खरी पावती—जी खूप काही सांगून जाते.
उपहारगृहाचे व्यवस्थापक हिमंतराव पंड्या
या मेहनतीचे मूर्तिमंत म्हणजे मंत्रालय उपहारगृहाचे कर्तव्यनिष्ठ वरिष्ठ व्यवस्थापक हिमंतराव नथुराम पंड्या. मूळचे राजस्थानचे असलेले पंड्या यांनी वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागी पाणी देणारा वेटर म्हणून १९८७ साली मंत्रालयाच्या ‘चौरस आहार’ उपहारगृहात सेवेला सुरुवात केली.अनेक छोटी-मोठी कामे करत, प्रचंड मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी आजच्या पदापर्यंत मजल मारली.सध्या ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मंत्रालय उपहारगृहाची खाद्यसंस्कृती अधिक समृद्ध झाली—याची नोंद कायमस्वरूपी घेतली जाईल, अशी अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment