मुंबई | प्रफुल चव्हाण
भांडुप : शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व सुगंधित सुपारीच्या वाहतूक आणि विक्रीविरोधात भांडुप पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत प्रतिबंधित सुगंधित सुपारी व सुगंधित तंबाखूसह पाच वाहने जप्त करण्यात आली असून एकूण १ कोटी १८ लाख २१ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
भांडुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित गुटखा व सुगंधित सुपारीची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना प्राप्त झाली होती. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लाड आणि त्यांच्या पथकाला कारवाईसाठी रवाना करण्यात आले.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १२ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे ४.२५ वाजता भांडुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महानगरपालिका पार्किंग, व्हिलेज रोड, नाहूर येथे पोलिसांनी सापळा रचला.
यावेळी पोलिसांनी कारवाई करत १ कंटेनर, २ टेम्पो, १ बोलेरो आणि १ पिकअप, अशी एकूण ५ वाहने ताब्यात घेतली. या कारवाईत ९ व्यक्तींनाही ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनांमधून वाराणसी आशीक सुगंधित सुपारी आणि सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित मुद्देमाल आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित पदार्थांची किंमत २० लाख २१ हजार १०० रुपये, तर जप्त केलेल्या पाच वाहनांची किंमत ९८ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
अशाप्रकारे प्रतिबंधित पदार्थ आणि वाहनांसह पोलिसांनी एकूण १ कोटी १८ लाख २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपआयुक्त अभयसिंह देशमुख आणि सहायक पोलीस आयुक्त अजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपना क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लाड, पोलीस हवालदार हिरालाल चरणाडे, पोलीस हवालदार मुकेश तिरमारे, पोलीस हवालदार गणेश सोनवणे, पोलीस शिपाई विकास शिंदे आणि पोलीस शिपाई विजयकुमार पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No comments:
Post a Comment