अमृतसर रेल्वे दुर्घटना,ड्रायव्हरचा लेखी जबाब - In India Live

Breaking News

21/10/2018

अमृतसर रेल्वे दुर्घटना,ड्रायव्हरचा लेखी जबाब



रजील मेनन,इन इंडिया लाइव

अमृतसर- दि.21 अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना भरधाव ट्रेनने चिरडल्याची ह्रदयद्रावक घटना दसऱ्यादिवशी शुक्रवार (19 ऑक्टोबर) रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 72 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील DMU गाडी 11091 रेल्वेच्या ड्रायव्हरने लेखी स्वरुपात आपलं उत्तर दिलं आहे. अरविंद कुमार असे या रेल्वेच्या ड्रायव्हरचे नाव असून या दुर्घटनेत माझी चूक नसल्याचे अरविंद कुमार यांनी म्हटले आहे.

स्थानकावरुन ग्रीन आणि यलो सिग्नल मिळाल्यामुळे गाडी घेऊन मी निघालो होतो. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी गाडी येताच, मला तेथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी दिसली. ते पाहताच मी गाडीचा मोठा हॉर्न दिला आणि इमर्जंसी ब्रेकही लावला. मात्र, गाडीचा वेग खूप असल्यामुळे  गाडी जागेवर थांबली नाही. त्यामुळे अनेकजण गाडीखाली येऊन मोठी दुर्घटना घडली. मात्र, त्यानंतर तेथील लोकांनी रेल्वेवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. अशावेळी गाडीतील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मी रेल्वे जागेवर न थांबवता पुढील स्टेशनवर नेली.तसेच, याबाबत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनाही माहिती दिली, असे या डीएमयु रेल्वेचे ड्रायव्हर अरविंद कुमार यांनी लेखी स्वरुपात दिली आहे.
अमृतसर रेल्वे दुर्घटनेत 60 पेक्षा अधिक नागरिकांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला. त्या प्रकरणात रेल्वेचा दोष नसल्याने, गाडीच्या ड्रायव्हरविरुद्ध कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शनिवारी स्पष्ट केले. त्यानंतर, आज रेल्वे ड्रायव्हरने आपला लेखी जबाब दिला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 61 झाली आहे. मृतांपैकी 9 जणांची ओळख पटणे शिल्लक आहे. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयलही अमेरिका दौरा सोडून परत आले.

दरम्यान, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी जखमींची विचारपूस केली व या दुर्घटनेची दंडाधिकारीय चौकशी जाहीर केली. रेल्वेही गँगमनने ड्रायव्हरला लाल बावटा का दाखवला नाही, याची चौकशी करणार आहे. मंत्री नवज्योत सिद्धू यांनीही रुग्णालय व अपघातस्थळी भेट दिली. सिद्धू यांच्या पत्नी कार्यक्रमास हजर होत्या. मात्र, त्या लवकर निघून गेल्या. त्यांनी सांगितले की, दहनाच्या वेळी रेल्वेमार्गावर उभे राहू नका, असे आयोजक वारंवार ध्वनिक्षेपकावरून सांगत होते. तसेच रेल्वेचा गेटमनही तेथे उपस्थित होता. त्याने लाल बावटा दाखवायला हवा होता. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा म्हणाले की, ही दुर्घटना होण्यात रेल्वेचा दोष नाही. त्यामुळे ड्रायव्हरवर कारवाई करण्यात येणार नाही.

No comments:

Post a Comment