सोलापूर, दि. १७ : वडार समाजाच्या विकासासाठी वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उपआराखडा तयार करून त्यासाठी १०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली जाईल,अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर वडार समाजाचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते.या मेळाव्यास महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे,केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री विजय देशमुख,खासदार विजयसिंह मोहिते-पाटील,खासदार राजन विचारे, आमदार बबनदादा शिंदे,आमदार प्रणिती शिंदे,आमदार भारत भालके,'मी वडार महाराष्ट्राचा'संघटनेचे अध्यक्ष विजय चौगुलेआदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,'वडार समाजाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. या समाजाने पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. आता या समाजाच्या विकासासाठी काम करण्याची वेळ आली आहे.या समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. विविध समस्या निराकरण करण्यासाठी इदाते आयोगाच्या शिफारशींचा विचार केला जाईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,वडार समाजातील बेघर लोकांना घरांसाठी आर्थिक मदत देण्यात येईल . वस्ती असलेल्या जमीनीच्या जागेचे मालकीचे अधिकार प्रदान करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.
वडार समाजातील शिक्षण संस्था साठी आणि वसतिगृहांसाठी जमीन देण्याचा राज्य शासन प्राधान्याने विचार करील. खाणी वितरणात वडार समाजाला आरक्षण देता येईल का याबाबत राज्य शासन विचार करील. वडार समाजातील युवक स्वयंरोजगाराकडे वळावा, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामांत समाजातील मजूर संस्थांना दहा टक्के कामे राखीव ठेवण्याबाबत विचार केला जाईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
वडार समाजाच्या विकासासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात येईल. या समितीच्या अध्यक्षपदी विजय चौगुले यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.चौगुले यांना राज्य मंत्री दर्जा दिला जाईल,असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले,सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे,अरविंद लिंबावळे यांची भाषणे झाली.
वडार समाजातील प्रशासकीय अधिकारी बालाजी मंजुळे, उद्योगपती दिलीपराव मोहिते,चित्रकार शशिकांत धोत्रे, अरविंद शिंदे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विजय चौगुले यांनी केले.
No comments:
Post a Comment