विकासाच्या थापा मारण्याआधी, साडेसहा हजार कोटी कधी देणार ते सांगा ? - In India Live

Breaking News

18/12/2018

विकासाच्या थापा मारण्याआधी, साडेसहा हजार कोटी कधी देणार ते सांगा ?

प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव
मुंबई दि. १८ डिसेंबर २०१८
शिर्डीमध्ये साईबाबांच्या समोर येऊन देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलले होते. तीच परंपरा कल्याण येथे देखील धादांत खोटे बोलून पंतप्रधानांनी सुरू ठेवली आहे. गेले चार वर्ष जुमलेबाजी व अतिरंजित आकडे दर्शवून खोट्या विकासाच्या वल्गना करणे यापेक्षा अधिक मोदी तसेच राज्यातील फडणवीस सरकारने काहीही केलेले नाही. धादांत खोटं बोलून अवास्तव घोषणांचा पाऊस पाडायचा ही कार्यपद्धती पंतप्रधानांनी कल्याण येथील भूमीपूजनाच्या कार्यक्रमात ही सुरू ठेवली आहे. निवडणूका केवळ काही महिनेच दूर असल्याने या जुमलेबाजीचा अंत जवळ आला असून नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांमध्ये तेथील जनतेने भाजपच्या जुमलेबाजीचा जसा अंत केला तसाच अंत महाराष्ट्राची जनता करेल, असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
यासंदर्भात बोलताना खासदार अशोक चव्हाण म्हणाले की,सिडको महागृहनिर्माण योजना 2018 अंतर्गत जवळपास89,771 हजार घरे बांधण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते आज कल्याण येथे करण्यात आले. सदर प्रकल्पा अन्वये नवी मुंबई येथील विविध रेल्वे स्थानकांच्या जवळ घरे बांधण्यात येणार आहेत. नवी मुंबई मध्ये बांधण्यात येणाऱ्या घरांचे भूमिपूजन कल्याण येथे कसे करण्यात येते याचे उत्तर पंतप्रधानांनी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावे. तसेच या गृहनिर्माण प्रकल्पाचे टेंडरही निघाले नाही. हा प्रकल्प इतर प्रस्तावित प्रकल्पांकरीता राखीव जागांवर करण्यात येणार असल्याने जमिनीच्या वापरातही बदल करणे अभिप्रेत आहे. त्यामुळे निवडणुकांपर्यंत ही सगळी प्रक्रिया पार पडणे शक्य नाही. म्हणूनच भूमीपूजनाचे नाटक करून जनतेला फसविले जात आहे. या घरांची किमान किंमत 25 लाख पेक्षा अधिक असेल असे दिसते परंतु प्रधानमंत्री आवास योजनेत केवळ अडीच लाख दिले जातात. त्यामुळे केवळ 10 टक्क्यांपेक्षाही कमी रक्कम देऊन ही योजना कशी फलदायी आहे हे दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे खा. चव्हाण म्हणाले.मेट्रो 5 च्या अन्वये ठाणे ते भिवंडी अशा मेट्रो प्रकल्पाचे आज पंतप्रधानांनी भूमिपूजन केले. सदर प्रकल्पाकरीता जमिनीचे एक इंचही अधिग्रहण झालेले नाही, पर्यावरण व वन विभागाची परवानगी देखील मिळलेली नाही,या मेट्रोचा मार्गही ठरलेला  नाही,तसेच टेंडरही निघालेलं नाही. असे असतानाही निवडणूका समोर ठेऊन भूमिपूजन करण्याचा हा सरकारचा प्रयत्न हास्यास्पद आहे.
याअगोदरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक याचे भूमिपूजन होऊन जवळपास 3 वर्षे होऊनही कामाची एकही वीट लागलेली नाही. बिहार तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये या भूमिपूजनाचा राजकीय उपयोग करून घेण्यात आला. बुलेट ट्रेनच्या भूमीपूजनाला देखील वर्ष होऊन गेलेलं आहे. परंतु जमीन अधिग्रहण तसेच मार्ग हे दोन्ही विषय अजूनही अडकलेले आहेत. तसेच उच्च न्यायालयाला त्याची दखल घ्यावी लागत आहे याची आठवण देखील चव्हाण यांनी करून दिली. तसेच विकासाच्या खोट्या वल्गना करण्याआधी कल्याण डोंबिवली करांचे साडेसहा हजार कोटी रुपये कधी देणार? ते सांगा असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी विचारला.
साईबाबांच्या समोर खोटे बोलून पंतप्रधानांनी खोटे बोलण्याच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. शिर्डी येथे 16,000 गावे दुष्काळमुक्त केली. असे धादांत खोटे वक्तव्य पंतप्रधानांनी केले. त्यानंतर केवळ 8 दिवसांत ही सर्व गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या यादीत दिसली आहेत. काँग्रेस प्रणित यूपीए सरकारच्या कार्यकाळात 25 लाख घरे बांधण्यात आली त्याच्या तुलनेत मोदी सरकारच्या चार वर्षाच्या कालावधीत 1 कोटी 25 लाख घरे बांधण्यात आली असे सपशेल खोटे वक्तव्य पंतप्रधानांनी केले होते. आज कल्याणमध्ये मोदीजींनी बोलतांना काँग्रेसच्या कार्यकाळात निर्माण केलेल्या घरांचा आकडा स्वतःच 50हजारांनी वाढवून 25 लाख 50हजार सांगितला. खोटं बोलणाऱ्यांची विधानं अशीच सतत बदलत असतात असे सांगून चव्हाण म्हणाले की, देशाच्या महालेखापालाने 2014 साली संसदेत मांडलेल्या अहवालातच यूपीए सरकारच्या कार्यकाळात केवळ 2011-2013 या तीन वर्षातच जवळपास 75 लाख घरे बांधून पूर्ण झाली होती असे सांगितले आहे. युपीए सरकारच्या 10 वर्षाच्या कालावधीत सव्वा दोन कोटींपेक्षा अधिक घरे बांधून पूर्ण झाली असतानाही पंतप्रधान खोटे सांगत आहेत. हा खोटेपणाचा कहर असून मोदी सरकारची अवस्था दयनीय झाली आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

1 comment:

  1. खोट कोण बोलत आहे जनता ठरवेल. तुमचया मताशी आमही सहमत नाही.

    ReplyDelete