प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव
ठाणे दि. 19 : ठाणे, पालघर,रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची पावसामुळे दुरावस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले खड्डे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी तात्काळ भरण्यास प्राधान्य द्यावे तसेच नवरात्रीपूर्वी सर्व रस्ते खड्डेमुक्त करावेत.या बरोबरच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांच्या संदर्भात वाहतूक विभागाने काढलेल्या अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आदेश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतूककोंडी या विषयावर आयोजित बैठकीत त्यांनी आदेश दिले. या बैठकीस पालघर,रायगडचे पालकमंत्री तथा,राज्यमंत्री बंदरे,वैद्यकीय शिक्षण,माहिती व तंत्रज्ञान,अन्न, नागरी पुरवठा,आणि ग्राहक संरक्षण रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील,आमदार सर्वश्री संजय केळकर, शांताराम मोरे,बाळाराम पाटील,आमदार बालाजी किणीकर सुभाष भोईर,आमदार ज्योती कलानी,जिल्हाधिकारी ठाणे राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी रायगड विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी पालघर कैलास शिंदे यांसह सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. ठाणे शहरामध्ये येणारे रस्ते आणि बाहेर जाणारे रस्ते यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीची कारणे आणि त्यावर संबंधित यंत्रणेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनेचा यावेळी पालकमंत्री शिंदे आणि चव्हाण यांनी आढावा घेतला.यावेळी बोलतांना पालकमंत्री शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, एम एम आर डीए ,एमएस आरडीसी, जेनपीटी,महानगरपालिका,नगरपालिका आणि जिल्हाप्रशासन आदी यंत्राणांनी समन्वय साधून वाहतूक कोंडीवर एकत्रित पणे उपाययोजना कराव्यात असे सांगितले. ठाणे वाहतूक विभागाने काढलेल्या अधिसूचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. यासाठी जेनपीटी मध्ये असलेल्या वाहनतळाचा तात्काळ वापर सुरु करण्यात यावा, रायगड जिल्हाधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना शिंदे यांनी दिल्या, तसेच सिडकोकडे असलेली वाहनतळे तात्काळ हस्तांतरीत करण्यात यावीत.पालघर जिल्हाधिकारी यांनी पालघर मधील दापचेरी, मनोर,चारोटी नाका, येथे जागेची उपलब्धता वाहनतळांसाठी करून द्यावी. ठाणे ग्रामीण भागातील शहापूर, पडघा यांचा वापर करावा. या वाहनतळाच्या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन, फलक तसेच बॅरिकेटस लावण्यासाठी आवश्यक असेलेला निधी जिल्हा वार्षिक योजनेमधून उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतील गोदामांचे वेळापत्रक निश्चित करून वेगवेगळ्या दिवशी सुट्टी देण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी ठाणे यांना त्यांनी यावेळी दिल्या.शहरांतर्गत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ज्या ठिकाणी मेट्रो चे काम चालू आहे त्याठिकाणी अनावश्यक असलेले बॅरीकेट्स हलविण्यात यावेत.तसेच शक्य असेल त्या ठिकाणी रस्ता उपलब्ध करून द्यावा,सेवा मार्गावरील (सर्विस रोड ) अतिक्रमणे हटविण्यात यावीत, रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या बसेस अन्य ठिकाणी हलविण्यात याव्यात, मनपाच्या ताब्यात असलेली 11वाहनतळे उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना यावेळी दिल्या.
पालकमंत्री चव्हाण यांनी पथकर मार्गावरील खड्डे प्राधान्याने भरण्याबाबत संबंधित संस्थाना आदेश दिले तसेच तात्काळ खड्डे न भरल्यास पथकर बंद करू असा इशाराही दिला. शीळ फाटा, कळंबोली नाका,पनवेल उरण रस्ता मुंब्रा बायपास आधी ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कोपरी पूल, पत्री पूल यांच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच या पुलंच्या कामाबाबत नागरिकांना माहिती देणारा फलक लावावा अशा सूचनाही संबंधित यंत्रणेला दिल्या. यांवेळी वाहतूक कोंडीवरील उपाय योजनांवर सविस्तर चर्चा झाली.अवजड वाहनांना करण्यात आलेल्या प्रवेश बंदीचे काटेकोर पालन झालेच पाहिजे असे निर्देशही त्यांनी पोलिसांना दिले जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांनी नवरात्रीपूर्वी सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी प्राधान्य द्यावे तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आदेशित उपाययोजना कराव्यात असे सांगितले.

No comments:
Post a Comment