मुंबई, दि. 4 : महसूल विभागामार्फत दिले जाणारे विविध दाखले त्यासाठी लागणाऱ्या निश्चित मुदतीत दिले जावेत. त्याचप्रमाणे काम झाल्यानंतर नागरिकांना त्याबाबत कळविण्यात यावे. त्यासाठी त्यांना फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासू नये, असे निर्देश मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पालकमंत्री .केसरकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात नागरिकांशी सुसंवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर, महानगरपालिका कार्यालयात सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांनी प्रामुख्याने जात प्रमाणपत्र, अभिलेखात नाव समाविष्ट करणे, मालमत्तापत्र, वारस नोंद, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला याबाबत समस्या मांडल्या, तर महानगरपालिका येथे झालेल्या सुसंवादात पाणीपुरवठा, रस्ता ओलांडण्यासाठी पूल बांधणे, अतिक्रमण हटविणे आदी विषयांचा समावेश होता. तातडीने अतिक्रमण हटविण्याबाबत पालकमंत्र्यांनी सहायक आयुक्तांना दूरध्वनीवरुन निर्देश दिले. पालकमंत्री.केसरकर यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन मंजुरी आदेशाचे तसेच तात्पुरत्या गौण खनिज परवान्यांचे वितरण करण्यात आले.
No comments:
Post a Comment