३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्येच्या घटनेवर,उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे तीव्र दुःख - In India Live

Breaking News

17/11/2025

३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्येच्या घटनेवर,उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे तीव्र दुःख

प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव 
मुंबई, १७ नोव्हेंबर २०२५ : नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या प्रकरणावर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. २४ वर्षीय आरोपी विजय संजय खेरनार याने अत्याचारानंतर मुलीची हत्या केली व फरार झाला होता. पोलिसांनी तत्काळ शोध घेत त्याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. 
या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “अशा नराधम प्रवृत्तीच्या व्यक्तींना कायद्याची आणि समाजाची भीती राहिली नाही. अनेक कायदे असूनही दोषसिद्धीचे प्रमाण केवळ २४ टक्के आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे. 
गुन्हा झाल्यानंतर आरोपीला शिक्षा निश्चित मिळाली पाहिजे, तेव्हाच समाजात संदेश जाईल की अशा विकृतीला जागा नाही. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी माझी स्पष्ट मागणी आहे आणि त्या दिशेने मी स्वतः पाठपुरावा करणार आहे.”

पुढे बोलताना त्यांनी अत्याचार पीडित मुलींच्या कुटुंबीयांना सुरक्षित वातावरण देण्यावर भर देत सांगितले की, “अत्याचाराची तक्रार पालकांनी ताबडतोब केली पाहिजे. पोलिसांनीही नवीन भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करताना आवश्यक माहिती देणे बंधनकारक असल्याने त्वरित कार्यवाही झाली पाहिजे. साक्षीदार संरक्षण कायद्याचा प्रभावी वापर झाला तर आरोपी दोषी सिद्ध होण्याची शक्यता वाढू शकते.”

डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणातही अत्यंत कठोर भूमिकेतून न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्य सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून आरोपीला तत्काळ कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी दोषसिद्धीचे प्रमाण आणि तपास प्रक्रिया मजबूत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

No comments:

Post a Comment