नवले पूल परिसर दुर्घटना, पीडित कुटुंबीयांची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट - In India Live

Breaking News

16/11/2025

नवले पूल परिसर दुर्घटना, पीडित कुटुंबीयांची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट

 
प्रफुल, चव्हाण, इन इंडिया लाईव
मुंबई दि. १६ नोव्हेंबर २०२५ : पुण्यातील नवलेपूल परिसर भीषण अपघातात मृत झालेल्या कुटुंबीयांची विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीत नवलकर आणि दाभाडे कुटुंबीयांशी संवाद साधताना एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावरील झालेला प्रचंड आघात आणि त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.दोन्ही कुटुंबातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक असल्यामुळे ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. गोऱ्हे यांनी कुटुंबीयांशी बोलताना एक गंभीर आणि धक्कादायक बाब उघड केली. अपघातानंतर मदत करत असल्याचे भासवून काही लोकांनी मृतांच्या आधार कार्ड, मोबाईल फोन,दागिने तसेच महत्वाच्या कागदपत्रांची चोरी केल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत पोलीस आयुक्त यांना तातडीने तपास करणेबाबत कळविणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या भेटीत त्यांनी स्थानिक अधिकार्‍यांना देखील उपस्थित राहण्याचे सांगितले होते, जेणेकरून नुकसानभरपाई, पुनर्वसन आणि शासकीय मदतीबाबत तत्काळ माहिती व दिशा मिळू शकेल. तरीही मानसिक धक्का मोठा असल्याने अशा दुर्घटनातील आर्थिक मदतीतून दुःख भरून निघणे शक्य नाही.त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना बाबत गंभीर होणे आता अत्यावश्यक झाले आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. गोऱ्हे यांनी यापूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा ना श्री नितीनजी गडकरी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा ना श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा ना श्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे केंद्र,राज्य व स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून उपाययोजना करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याबाबत कळविले आहे.या निवेदनात त्यांनी नवले पुलावरील धोकादायक उतारात तातडीने बदल, पर्यायी वाहतुकीची सोय, कात्रज बोगद्यापासून न्यूट्रलवर उतरणाऱ्या वाहनचालकांसाठी विशेष जनजागृती, उतारावर वेग नियंत्रणाचे तांत्रिक उपाय तसेच जड वाहनांची तपासणी इत्यादी आवश्यक उपाययोजना करणेबाबत नमूद केले आहे . याशिवाय या स्थळी वारंवार घडणाऱ्या अपघातांवर कायमस्वरूपी उपाय योजना सुचविणे व त्याच्या अंमलबजावणी कामी मुंबईत लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले.
“सरकारची मदत लवकरच मिळेल, असे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे. मात्र याचबरोबर विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेनेच्या वतीने आम्ही तातडीची आर्थिक मदत स्वतः दिली आहे,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

या भेटीत पुणे युवा सेना शहर प्रमुख निलेश गिरमे, युवासेना जिल्हा प्रमुख निलेश घारे आणि युवासेना प्रमुख सोमनाथ कुटे ,कार्यकर्ते लोकेश राठोड,हृतिक गलांडे व चेतन कोद्रे हे उपस्थित होते. तसेच प्रशासनाच्यावतीने मंडळ अधिकारी श्रीमती अर्चना ढेंबरे यादेखील उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे यांनी मृत स्वाती नवलकर यांच्या पती संतोष नवलकर तसेच त्यांचा मुलगा आणि मुलगी यांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच मृत दत्ता दाभाडे यांच्या मुलगी कोमल दाभाडे यांनाही भेट देत त्यांच्या दुःखात सहभाग नोंदवला.
त्यांनी दिलेल्या निवेदनाची प्रतही कुटुंबीयांना देण्यात आली असून या प्रकरणात केंद्र सरकार,महाराष्ट्र शासन,स्थानिक प्रशासन यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा उपस्थित केली.

No comments:

Post a Comment