प्रफुल चव्हाण. इन इंडिया लाईव
मुंबई, दि. ०१ राज्यातील २६४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता.०२) मतदान होणार असून, त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण १२ हजार ३१६ मतदान केंद्रांसाठी ६२ हजार १०८ निवडणूक अधिकारी/ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या २६४ अध्यक्षपदांच्या आणि ६ हजार ४२ सदस्यपदांच्या जागांसाठी उद्या मतदान होईल. संपूर्ण निवडणूक प्रकियेसाठी पुरेशा मतदान यंत्रांची (EVM) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात एकूण १७ हजार ३६७ कंट्रोल युनिट; तर ३४ हजार ७३४ बॅलेट युनिटचा समावेश आहे. अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा समावेशअसलेली मतदान पथके मतदान केंद्रावर सुरळित पोहचली आहेत. उद्या सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात होईल. सांयकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असेल.
राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या (एकूण २८८) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता.
आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय २३ नोव्हेंबर २०२५ रोजी किंवा त्यानंतर आल्याने २४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार नाही. तेथे सुधारित कार्यक्रमानुसार २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता उर्वरित २६४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होईल. त्यातील ७६ नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील न्यायालयीन प्रकरणांमुळे बाधित १५४ जागांसाठीदेखील मतदान होणार नाही. तिथेही सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित बाधित जागांसाठी २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होईल.

No comments:
Post a Comment